Total Pageviews

Thursday 21 July 2016

आईस ब्रेकिंग भाग-१ !!

ये सिव्हिल ख्या ख्या ख्या!! फॅन्ड्री इस्टाईल !!
मराठी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्युनिटीला एकत्र करण्यासाठी मी आज ह्या ब्लॉगचा शुभारंभ करीत आहे. इथे आपण सिव्हिल इंजिनिअर लोक्स आपले विचार एकमेकांना शेअर करण्यासाठी मी हा कट्टा अनाहूतपणे  स्थापन केला. दगड, विटा, लोखंड, सिमेंट वाळूच्या जंगलात आपण रुक्ष जीवन जगत असतो आणि रोज स्पर्धेला तोंड देत धावत असतो. आपल्या अनेक समस्या आहेत. करिअर, चांगली नोकरी, व्यवसाय, कामातील तांत्रिक अडचणी, वयक्तिक जीवन, आपले कुटुंब!! सगळ्याच विषयावर आपण इथे मनमोकळेपणाने चर्चा करूयात! शिवाय आपल्या समस्या सोडवायचा प्रयत्न करूयात. 
नक्कीच ह्या ब्लॉगच्या रूपाने मी सगळ्यांशी सुसंवाद साधू शकेल, माझे अनुभव व ज्ञानाची देवाणघेवाण करू शकेल अशी अशा करतो.
मी हा ब्लॉग मुद्दाम मराठीत ठेवलाय कारण आपल्या क्षेत्रात सगळे काम इंग्रजीत चालते पण आपली मने मराठीत विचार करीत असतात. आपल्या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान इंग्रजीत असल्याने कळायला अवघड जाते. चर्चा करताना बंधने येतात. बरेच माहीत असते पण ते कसे ओकायचे ते कळत नाही. किंवा अचानक एखादा अवघड इंग्रजी शब्द समोर येतो तेव्हा गाडी अडकून पडते आणि आपण तिथेच मार खातो. 
माझ्याविषयी थोडेसे: 
मी अपघाताने सिव्हिल इंजिनिअर झालो !! दहावीला गडगडलो ७८% टक्क्यावर. बहिणीला आणि मला एकाच कॉलेजला घालायच्या नादात मला कुसरो वाडिया मध्ये डिप्लोमाला घुसडले गेले (१९८९). अतिशय काळा काळा काळा काळाकुट्ट दिवस तो!! तिथे मात्र बहिणीनेच इंग्रजी शिकवले आणि चांगले ८६% मिळाले. त्यामुळे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकीचा दरवाजा उघडला आणि थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला. तिथून मी ६६% मिळवून मैदानात फेकला गेलो, फेकला नाही गेलो स्वतःच उडी मारायला लागली तीही परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी. कारण  परिस्तिथी! आणि ती पडली नेमकी शापूरजी पालोनजीच्या दारात पिंपरीला. तिथे वर्ष दीड वर्ष काढून पुण्यातील किर्लोस्कर कन्सल्टन्टला घुसलो! डोक्यात वेड होते डिझाईन शिकायचे. पाच वर्षे तिथे डिझाईन शिकता शिकता इतक्या लाथा बुक्क्या खाल्ल्या की पैलवान बनूनच बाहेर पडलो! कृष्णा खोरे विकास महामंडळाचे टेम्भू ताकारी म्हैसाळ प्रकल्पाचे डिझाईनचे काम नोकरी सोडून करायला घेतले. लग्नही झाले होते आणि मुलगीही. कृष्णा खोरेचे काम चालले १-२ वर्षे आणि सरकार गडगडले. मग मीही उधे इंडिया पुणेला उडी हाणली!! माझ्या नुसत्या उड्या पाहून आईवडील वैतागले, लहान भाऊ टेल्कोला. त्याला त्यांनी फ्लॅट घेऊन दिला आणि गेले त्याच्याकडे.
मग उधेत आंडू-गांडू वाले दक्षिणी भेटले आणि आधी गुज्जू चिकटलेले होतेच. त्यांच्या काट्याकुट्यातून बाहेर पडत पडत कव्हर्नर पावरगॅस गाठले! सरड्याची धाव कुंपणापर्यंत कारण पुण्यात ह्या दोनच कंपन्या. त्याही उठसूट मुंबईला हाकलायच्या. लय बाराचे लोक्स हे...तोवर २००३ उजाडले होते. 
मुलगा झाला, पुण्यात घर-वजा बंगला झाला. बंगला कसला गुंठेवारीत बांधलेले घर. पाण्यासाठी बायको हंडा घेऊन पाळायची ! मग रात्री मी शिव्या खायच्या गप. आपुन सिव्हिल विंजिनिअर म्हटल्यावर फ्लॅट घेऊन बिल्डरच्या मढ्यावर पैसे कशाला घालायचे हा हट्ट वजा खाज होती ना. एकदा असाच वैतागलेला असताना मित्राचा ईमेल आला की कुवेतला जातोस का? 
च्यायला हा कुवेत म्हणजे बाबा-आदम च्या काळातला एखादा मुहल्ला असणार असेच वाटले होते! आणि थोडे होतेही तसेच. पुढे तिथे बुरखा आणि पांढरे डगले बघून पटले! २५ हजार कुठे आणि दोन लाख कुठे. पैसे के लिये कुछ भी करेगा!! 
शेवटी मनाचा हिय्या करून बायका-पोरे काही महिने का होईना पुण्यनगरीत सोडून कुवेतला गेलो. २००४ चा काळा दिवस तो! तिथे फ्लोर कंपनी भेटली तिने २ वर्षात अमेरिकेचे दर्शन घडवले. नंतर तीही सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली गेली. मग तिथली सरकारी कंपनी केएनपीसी आ वासूनच बसली होती तिथे उडी हाणली. सरकारी नोकरी म्हणजे झोपून पगार! ये बात कुछ हजम नाही हुई म्हणून मग युएईतील अजमानला बेल्लेली नावाच्या बाईकडे हनुमान उडी हाणली. 
तिथे ही कुथ कुथ कुथलो म्हणून पगार पाच लाखाच्या घरात गेला. आता साडेसहा लाख घेऊन सायपेम खुणावत होता. घी देखा लेकिन बडगा नाही देखा असे झाले आणि गेल्यागेल्या सायपेमने इराकच्या प्रोजेक्ट्ला जुंपले. काम म्हटल्यावर इराकला येणे-जाणे सुरू झाले. असे येणे-जाणे बायकोला अजिबात आवडत नसते बरका ! म्हणून घरातून फटके आणि तिकडे बंदुकीचे फटके!!
फटके वाचवले म्हणून बरे. ते लोक असेच खुशीत आले की वाजवतात असे फटाके. घाबरायचं नसतं. मुलीचं दहावीचं वरीस.
आणि माझे असे हे चाळे सुरू होते. बायकोने खडसावले आता बास करा आणि घरी चला. तरीही मी तिथल्या एक दगडावर पाय ठेऊन पुण्यात आलो. हा तसला दगड नाही बरका.. हा पोट भरायचा दगड हाये. 
आता दोन दगडावर पाय ठेवल्यावर काय गत होते ते अनुभवतो आहे. २०१६ चाललंय.. बरं चाललंय. 
तर ही आहे अपुनकी ईस्टोरी !!
तर चला मारूया गप्पा...

No comments:

Post a Comment