Total Pageviews

Tuesday 23 May 2017

व्यावसायिक जातीयता

तो काळ साधारण १९९६ ते २००० चा होता. १९९२ ला डिप्लोमा पूर्ण केला मग नशिबाने साथ दिली आणि शासकीय अभियांत्रिकी पुणे इथे मेरिटवर प्रवेश मिळाला. आर्थिक ताणात ते ३ वर्ष काढणे दिव्य होते. १९९५ ला एकदाचा विशेष गुणवत्ता मिळवत डिग्री पास झालो. परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी पिंपरीत शापूर्जी कंपनीत इंटरव्यू दिला आणि इतकी घाई झाली होती कि आठवड्यात नोकरीला जॉईन झालो. पगार साडेतीन हज्जार... आकाश ठेंगणे झाले होते!!
मी लहानाचा मोठा झालो ते सासवडमध्ये. हे एक ऐतिहासिक, जातीवर्णाची उतरंड असलेले तालुक्याचे गाव. तिथून पुण्यात आलो तेव्हा पुण्यात निदान बाहेरून तरी जातिपाती, वर्ण असले काही दिसत नव्हते. पीएमटी बसमध्ये सगळ्याच लोकांना लटकून प्रवास करायला लागायचा, कोणी लहान कोणी थोर असे काही नव्हते.  

मला अनायासे ऑफिसचा जॉब मिळाला. ऑफिसमध्ये ओळखी झाल्या. नाव, आडनाव विचारणे झाले. मग नेहमीचा खास प्रश्न तुम्ही देशस्थ का कोकणस्थ कि कऱ्हाडे? मी मनात येईल ते फेकून मोकळा होत झालो. पुढे काही दिवसांनी असा घोळ झाला कि काही महाभाग त्यांच्या नात्यातील मुलींची स्थळे घेऊन यायला लागले. 

हे करता करता पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील किर्लोस्कर कन्सल्टंट ह्या नामांकित कंपनीत नोकरीसाठी सहज फोन केला. तिथे श्री. कुमटा नावाचे कारवारी व्यक्ती व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यांनाही स्ट्रक्चरल इंजिनिअर नावाचे बकरू हवेच होते. त्यात मी आयता फोन केलेला. त्यांनी तत्काळ जिथे आहेस तिथून निघून ये असा निरोप धाडला. गेलो आणि थेट कामालाच लागलो. पगार साडेपाच हज्जार!! हे झाले १९९६ साली.

तिथेही नाव आडनाव विचारणे झाले. देशस्थ, कोकणस्थ कि कऱ्हाडे हेही झाले. मी एकटा इंजिनिअर होतो आणि सुमारे १५ ते २० ड्राफ्टसमन लोकांना आधी डिझाईन कॅल्कूलेशन करून मग काम द्यावे लागायचे. त्यात काही बाहेरचे कंत्राट पद्धतीने काम करणारे मोठे इंजिनिअर होते. त्यांनी पाठवलेले काम ड्राफ्टसमन कडून करून घेणे हेही माझ्याच माथी लादले गेले होते.मीही माझी स्वतंत्र डिझाईन करीत होतो. 

कंपनीकडे काम वाढत होते. तसेच मनेजर लेवलला सत्तेच्या दोन फळ्या निर्माण होऊ घातल्या होत्या. श्री कुमटा सोडून जी दुसरी फळी (श्री. टिळक हे त्या फळीचे मुख्य) होती त्यांनाही एक सिनियर स्ट्रक्चरल इंजिनिअर हवाच होता आणि त्याप्रमाणे त्यांनी तो आणला. तोवर मी अनेक कामे पूर्ण करून टाकली होती. काही कामात अर्धा-अधिक घुसलो होतो. 

नवीन आलेली व्यक्ती अर्थातच अधिक अनुभव असलेली होती. शिक्षणही माझ्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे मी त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करायचे असा अलिखित नियम त्याच व्यक्तीने बनवायला सुरुवात केली. ह्या व्यक्तीला आपण "भी-साहेब" असे म्हणू!!
त्यात श्री टिळक यांनी किर्लोस्कर ब्रदर्स ह्या नात्यातील कंपनीतून मिनी जलविद्युत प्रकल्पांचे काम आणले होते. त्यात तीन साईटस वर वेगवेगळे प्रकल्प उभारायचे होते. १) मुकुर्ती २) अलीयार आणि ३) पेरुंचानी. ह्या त्या तीन साईट होत्या.

रान्त्रंदिन जागून मला त्यातील जे २ प्रकल्प दिले होते त्याचे डिझाईन, ड्रोइंग पूर्ण केले होते, क्लायंट कडून खूप घाई असल्याने मला  ते घेऊन चेन्नईला पाठविण्यात आले. तामिळनाडू इलेक्ट्रिसिटी बोर्डची 8 मजल्याची इमारत चढून जिथे मुकुर्ती प्रोजेक्टची टीम बसते तिथे मी गेलो. 

इन्जिनिअर लोकांशी ओळखी झाल्या. सर्वात शेवटी तिथल्या हेड-बाई होत्या त्यांची भेट घेतली.  डिझाईन/ड्रोइंग कसे केले आहेत ते समजावून सांगितले. त्या हेडबाई रिटायरमेंटला आल्या होत्या व त्याचे अर्धे आयुष्य जलविद्युत प्रकल्पात काम करण्यात गेलेले होते. तिथेच बाजूला वैज्यनाथन नावाचे अतिशय अनुभवी खिलाडी बसलेले असत. त्यांची अनेक पुस्तके इन्जिनिअरिन्गला शिकवली आजही जातात. 

हेड बाईंनी दोन असिस्टन्टला मी केलेले काम चेक करायला सांगितले. चेक करून मग त्या असिस्टन्टने ते काम हेड-बाईंना रिपोर्ट केले. त्यांनी ते चटचट बघून काय काय सुधारणा करायच्या ते सांगितले. मी लगेच रूमवर बसून ते काम संपवून टाकले. दुसऱ्याच दिवशी हेड-बाईंनी मान्यता (अप्रुव्हल) चे शिक्के मारले. मी एकदम खुश होतो. विजयी मुद्रेने मी पुण्याच्या ऑफिसात पाय ठेवला. मुकुर्ती संपवले होते, आता अलीयार हातात घे अशी ऑर्डर टिळकांनी दिली. मग तेही सगळे घोटून घोटून पूर्ण केले व परत चेन्नईला गेलो. 

अलीयारची वेगळी टीम होती, साहेब हा आडदांड होता. पण मनाचा मोकळा होता. त्याने सगळे डिझाईन प्रकरण पहिले आणि तत्काळ ऑर्डर सोडली कि मुकुर्तीच्या  हेडबाईंनी जे केलय त्याप्रमाणे सगळे चेक करा. माझे काम सोप्पे झाले. त्यांनी सुधारणा सांगितल्या व त्या मी केल्या. फायनल शिक्का घेऊन मी विजयी मुद्रेने पुण्याच्या ऑफिसात पोचलो. काम पूर्ण करायला थोडाच उशीर झालेला होता. 
पण त्यात इकडे पेशवाई राजकारण सुरु झाले. भी-साहेब हे अजिबात मान्य करायला तयार नव्हते कि अविनाश हे सगळे काम पूर्ण करून यशस्वी होऊन येत शकतो. (इगो कि काय कोणास ठाऊक) त्यांनी जाहीर करून टाकले कि केलेल्या कामात असंख्य चुका आहेत. त्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. मला सगळे परत एकदा तपासून बघायचे आहे असेही त्यांनी जाहीर केले. अर्थात याआधी मी चुका करतो हे आकलन होण्या इतकाही तांत्रिक विषयात त्यांच्याशी माझा संबंध आला नव्हता. कारण ते कायम त्यांचे आका यांच्या रुममध्ये गप्पा मारत बसलेले असत. त्यांना दिलेले काम अतिशय संथ गतीने चालले होते. रमत-गमत गप्पा-टप्पा करत.   ज्या सोफ्टवेअर मध्ये मी काम करत होतो त्याचा अं-कि ठं त्या भी-साहेबाला माहित नव्हता. आधी माझ्याकडून ते शिकून घ्यायला तो बसला. सोफ्टवेअर व त्यातील बारकावे त्याच्या डोक्यात घुसत नव्हते. मग त्याने आपला मोर्चा  ड्रोइंगकडे वळविला. त्यात त्याच्या दृष्टीने काय काय चुका आहेत ह्या काढून तो रोज वरपर्यंत घेऊन जात होता. त्याने वरिष्ठ साहेबांना अगदी घाबरवून सोडले. 
इतकी इर्षा मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो. हे प्रकरण पुढे किर्लोस्कर ब्रदर्सकडे गेले. तेही घाबरले. त्यांनी तत्काळ भी-साहेब आणि मला चेन्नईला जाऊन सगळे सुरळीत करायचा हुकुम दिला. भी-साहेब तिथे पोचल्यावर  सोफ्टवेअरचा अं-कि-ठं  माहित नसल्यामुळे फक्त ड्रोइंगवर घुसले.  अनेक प्रकारे केलेली ड्रोइंग कशी चुकीची आहेत हे तिथल्या अधिकाऱ्यांच्या गळी उतरवू लागले. 
तेथील लोकही गोंधळले. एक व्यक्ती सगळे अप्रुव्हल घेऊन गेली आणि त्याच कंपनीचा दुसरा मानूस येऊन त्यात चुका दाखवत आहे, हे त्यांना फार थोरच वाटले. मग सगळे सुरुवातीपासून चेक करणे सुरु झाले.यात दोन तीन महिने गेले. कामाला झालेला उशीर वाढत होताच. 
तरीही आत्तापर्यंत हे प्रकरण मुकुर्ती हेड-बाईंकडे गेले नव्हते. कारण त्या मोठ्या सुट्टीवर गेल्या होत्या. सरतेशेवटी त्या आल्या आणि सगळ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. 
त्या सर्वात अनुभवी आणि डिझाईन मधील सर्वेसर्वा होत्या. त्यांनी अप्रूव्ह केलेल्या ड्रोइंगमध्ये चुका आहेत हे ऐकून त्याही संतापल्या. वरिष्ठ लोकांची मोठी मिटिंग झाली व जो काही सावळा गोंधळ चालला होता त्याला पूर्णविराम मिळाला. भी-साहेबांनी सांगितलेले अगदी एक-दोन करेक्शन करून घ्यायचे व त्यांच्या विद्वत्तेचा मान राखायचा असे ठरले. त्यात तीसरे स्टेशन पेरुंचानी जे भी-साहेब करणार होते त्याची प्रगती शून्य होती. उशीर तर फार झाला होता. मग तेही माझ्या माथ्यावर आदळून भी-साहेब पुण्याला आले. पुण्यात आल्यावर माझ्या नावाने येथेछछ बोंब मारिली. मी कामाची पूर्ण वाट लावून टाकली होती, ते सगळे व्यवस्थित करून आलोय असे भी-साहेबांनी पटवून दिले. मी १ महिन्याने पेरुंचानी संपवून पुण्यात आलो. तेव्हा श्री टिळक माझ्या सिटजवळ आले व हस्तांदोलन करून म्हणाले कि वा वा वा चांगली वाट लावली माझ्या प्रोजेक्टची, congrats, वर शिव्या हासडल्या. 
त्यानंतरची दोन-तीन वर्षे अशीच झगडा करत घालवली. पण हा वाईट अनुभव पक्का लक्षात राहिला.
तर हि अशी आपली संस्कृती!! कोणाची जात कुठली व कोणी कोणाशी युती केलेली होती यात मी पडत नाही. श्री कुमटा हे मात्र वरवर मला ओरडत असले तरी आतून अतिशय मौ माणूस होता ते प्रमोशन देताना दिसायचे. 
गंमत असते ना  एक एक, तुम्हाला काय अनुभव आलाय??
 
  



No comments:

Post a Comment