Total Pageviews

Saturday 23 July 2016

कोणी नोकरी देता का नोकरी? भाग -१


मी अगदी पहिल्या लेखातच ह्या नोकरी विषयाला हात घालतोय... तेही चिडवणारे शीर्षक देऊन.. जरा आगाऊपणा केलाय खराकारण तो सिव्हीलीयन लोकांनी करायलाच पाहिजे. आपण मरमर करून शिक्षण घेतो. कसलेही कष्टाचे काम करायला तयार असतो. आणि ते करतोही. तरीही मालक लोक्स आणि त्यांचे चमचे आपल्याला वापरून फेकून देतात आणि आपण हे सहन करत राहतो म्हणून मी हा त्रागा करतोय. असो तर आपण नोकरी ह्या विषयात घुसुया आणि पूर्ण भुगा पाडू त्याचा.. 
आपण सगळे नोकरीच शोधत असतो, कारण व्यवसाय करायला आपल्याकडे मोठे भांडवल नसते. असले तरी आपल्याकडच्या कुत्तरओढीत ते कुठल्या कुठे गुल होईल ते सांगता येत नाही. नुसता प्लान पास करून घ्यायला पालिका आणि जिल्हा कार्यालयात लाखोने पैसे टेबलाखालून द्यावे लागतात. 
बर व्यवसायात सतत कामे मिळतीलच असे नाही, पण रोजच्या जबाबदाऱ्यातून सुटका नसते तेव्हा काय करायचे? तर अशाप्रकारे डिग्री डिप्लोमा किंवा पोस्ट-ग्रॅज्युएट झालेल्या प्रत्येकाची "बस एक नोकरी चाहिये यार" अशी अवस्था झालेली असते. बाजारातील मंदीमुळे नोकरी जाते किंवा जाण्याची चिन्हे दिसत असतात. कधीकधी पगार अतिशय तुटपुंजा असतो तर कधीकधी सहकर्मचाऱ्याला अधिक पगार दिलेला असतो. मनाजोगते काम नसते. बॉसिंग होत असते, संध्याकाळी बसवून फुकट काम करवून घेतले जाते. नोकरीतील स्पर्धा राजकारण अशी असंख्य कारणे असतात की ज्यामुळे आपल्याला एका उत्तम व चांगल्या नोकरीची गरज असते. तुम्हाला गरज असते पण नोकरी कायम तुमच्या दारात उभी नसते. चांगली नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी करणे आवश्यक असते. 
नोकरी मिळवण्यासाठी: 
१) जॉब पोर्टल: कंपन्या आणि उमेदवार ह्यांना जोडणाऱ्या अनेक जॉब पोर्टल सध्या उपलब्ध आहेत. त्या पोर्टलवर आपले नाव नोंदणी करणे आवश्यक असते. तुमचा रिज्युम थोडक्यात आकर्षक पद्धतीने व कंपन्यांना नेमके तुमचे कोणते स्किल हवे आहे ते किंवा तुमच्याकडे आहे ते त्यात नमूद करून तिथे अपलोड करावा लागतो. बऱ्याचदा कंपन्या किंवा त्यांचे एजंट काही किवर्ड (शब्द) टाकून ठराविक स्किल असलेले लोक शोधत असतात आणि ते स्किल तुमच्या रिज्युममध्ये असेल तर तुमचा रिज्युम त्यांना लगेच दिसतो. इथेही बरेच लोक काही चुका करतात. मला स्टॅड/सॅक्स/कॅड येते इतकेच लिहितात, पण त्यात नक्की काय काम कसले प्रोजेक्ट्स तुम्ही केलेत ते लिहिणे महत्वाचे असते. याशिवाय अनेक चिल्लर प्रकारची कामे तुम्ही भलेमोठे विद्वान असलात तरी करावी लागतात आणि ती करणारे लोक कंपन्यांना हवे असतात तेव्हा ती केलेली कामे व स्किल चिकटवणे गरजेचे असते. 
२) मित्रांचे नेटवर्क: तुम्ही जिथे काम करीत असता तिथे मित्रांचे एक नेटवर्क निर्माण करणे महत्वाचे असते. त्यात पॉजिटीव्ह वृत्ती असायला हवी. चर्चा चित्रपट व राजकारण ह्याबरोबरच नोकरीच्या संधी, येणारे नवे प्रोजेक्ट्स यावर करायला हवी. बऱ्याचदा एखाद्याला नोकरी बदलायची इच्छा नसते किंवा काही कारणास्तव बदलू शकत नसतो पण त्याला ऑफर येत असतात तेव्हा त्या आपल्या मित्रांना पाठवणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. 
बरेच थोडे लोक असतात जे वेगळ्या वाटा शोधतात. त्या वाटेवर ते एकटे असतात. अशावेळी त्यांना कोणीतरी साथीदार हवा असतो. उदाहरण द्यायचे झाले तर २००६ ला कॅनडात खूप संधी होत्या. पण इतक्या दूर एकट्याने जायला लोक घाबरत होते. तेव्हा तिथे माझे काही मित्र गेले आणि नंतर त्यांच्या संपर्कातील इतरांना तिकडे संधी देऊन बोलावून घेतले. आता कॅनडात मराठी/भारतीय इंजिनिअर लोकांची मोठी लॉबी तयार झाले आहे. ते एकत्र सण साजरे करतात. पण ह्यासाठी मदत देणारा व घेणारा यांची पॉजिटीव्ह वृत्ती हवी. ज्याने मदत केली त्याने मी तुला इथे आणले म्हणून तू माझे ऐक असे बॉसिंग करू नये किंवा ज्याला मदत मिळाली त्याने स्पर्धेच्या वृत्तीने कुरघोड्या करू नयेत. 
३) व्यावसायिक नीतिमत्ता: याला आपण professional ethics असे म्हणतो. बाजारात अनेक नोकऱ्या असतात तेव्हा एकाला लटकावून दुसऱ्याला गळाला लावणे चुकीचे असते. पगारवाढ साधून घेण्यासाठी ऐन कामाच्या वेळी राजीनामा देऊन वरिष्ठांना अडचणीत आणू नये. कारण या दोन्ही गोष्टी केल्याने ज्यांनी तुम्हाला संधी दिलीये अशांना दुखावत असता आणि एक दरवाजा तुमच्यासाठी कायमचा बंद करून घेत असता. 
काम करीत असताना पूर्ण पारदर्शकता ठेवा. तुम्हाला जीजी माहिती मिळाली आहे ती आधी स्पष्ट कागदावर लिहीत चला. जास्तीत जास्त अधिकृत माहितीचा उपयोग करा. कमीत कमी अनुमाने करा. फार जबाबदारीचा विषय असेल तर विषयाच्या जास्तीत जास्त खोलात जायचा प्रयत्न करीत राहा. आळस अजिबात करू नका. काहीही अडचणी असतील तर साहेबाला भेटून स्पष्ट करा. त्या नुसत्या मनात ठेवल्या तर तुम्ही काहीतरी लबाडी करताय असे बॉसला वाटू शकते. कुठेली काम तुम्हाला त्यातील पूर्ण स्पष्टता आल्याशिवाय करू नका. असे बरेच उपदेशाचे डोस मी तुम्हाला पुढच्या लेखात देणार आहेच!! ते पुढे बघू.
४) नक्की कसे आणि कुठे जीवन जगायचे ते ठरवा: बरेचदा आपल्यापैकी अनेकांना आपल्या प्रदेशाबाहेर/देशाबाहेर अनेक संधी असतात हे माहीतच नसते. माहीत पडले तरी परदेशात जायचे म्हणजे फार अवघड काम असे समजून ते सोडून देतात. काहींना जातीचे आरक्षण असल्याने ते इथेच प्रयत्न करत राहतात व दहाएक वर्षात त्यांना असा एखादा सरकारी जॉब मिळून जातो. आणि सरकारी नोकरी म्हणजे काय खास हे वेगळे सांगायला नको. मी भारतात काम करीत असताना सरकारी नोकरीचा शोध घेताना अंगावर काटा यायचा. हे भले भले फॉर्म भरा, अनेक कागदपत्रे जोडा. नंतर तुमचा अर्ज कुठे जातो त्याचे काय झाले हे विचारायची सोय नाही. मग आपले वाट बघत बसायचे. ज्याला अजिबात जबाबदारी नाही तो अशी वाट पाहू शकतो. पण ज्याचे खरोखरच हातावर पोट आहे त्याला नको रे बाबा ते सरकारी असे होऊन जाते. 
तर अशाप्रकारे हे नोकरीचे योग साधून घ्यायचे असतात. ते साधून घेताना फार अडचणी येतात. आत्ताचेच बघाना २०१२ पासून क्रूड ऑईलची किंमत घसरून ४० डॉलरच्या आसपास आलेली आहे त्यामुळे आखातातील सगळे काम थंडावले आहे. निदान त्यांचे काम थंडावले तर आपल्यासारख्या देशात कामाने उचल खाल्ली पाहिजे, कारण आपल्याला आपल्या देशात कमी खर्चात मोठमोठी कामे करवून घेण्याची हीच संधी असते. पण काही कारणास्तव तसे होत नाही. 
क्रूड तेलाचे भाव वाढले की जागतिक स्तरावर मोठमोठे प्रोजेकट यायला लागतात व नोकरीच्या संधी सर्वत्र वाढतात. त्याचवेळी पेट्रोल वाढल्याने महागाई वाढते पण त्याचे दुःख सिव्हिलच्या लोकांनी करून घ्यायची गरज नाही कारण आपले पगार वाढतात आणि पेट्रोल कितीही वाढले तरी ते सामान्य लोकांचा विचार करून त्याचे दर एक मर्यादेत ठेवले जातात. जे सरकार आपल्याला नोकऱ्या उपलब्ध करून देत नाही त्याच्या डोक्यावर हा अतिरिक्त खर्च पडतो तर पडूद्याना!! आपल्या बापाचे काय जाते असा वाक्प्रचार इथे वापरून मोकळे व्हायचे असते!!
दुसरे असे शास्त्र असते की जितके जास्त पासआउट झालेले इंजिनिअर मार्केट मध्ये येतात तितका पगार कमी होत जात असतो. कारण इंजिनिअरची स्पर्धा वाढलेली असते आणि नोकऱ्या तितक्याच असतात किंवा काही कारणास्तव कमी होऊ शकतात. 
(क्रमश: )






No comments:

Post a Comment